फेसबुकवरील मैत्रिणीसोबत लग्न करण्यास नकार दिल्याने २६ वर्षीय तरुणाने आपल्याच आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीमधील जामिया नगरमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी मुलगा आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.

अब्दुल रहमान असं या आरोपीचं नाव आहे. आपल्या आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. अब्दुल कानपूरमधील एका महिलेच्या प्रेमात पडला होता. दोन वर्षांपुर्वी फेसबुकवर त्यांची मैत्री झाली होती. आपल्या आई-वडिलांची सर्व संपत्ती आपल्याला मिळावी यासाठी त्याने त्यांची हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अब्दुलचा घटस्फोट झाला होता. २०१७ मध्ये पालकांनी टाकलेल्या दबावामुळे त्याने दुसरं लग्न केलं होतं. यादरम्यान त्याची कानपूरमधील एका महिलेशी मैत्री झाली होती. दुसऱ्या लग्नानंतरही त्याचं प्रेमप्रकरण सुरुच होतं. तो नेहमी आपल्या फेसबुक मैत्रिणीला भेटत होता. त्याने लग्नाचं आश्वासनही दिलं होतं असं पोलीस उपायुक्त चिन्मॉय बिस्वाल यांनी सांगितलं आहे.

आरोपी कॉल सेंटरमध्ये काम करायचा. पण अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याने त्याची नोकरी गेली होती. अब्दुलने आपल्या पालकांना फेसबुक मैत्रिणीसोबत लग्न करायचं असल्याचं सांगितल्यानंतर त्यांनी नकार दिला. यानंतर अब्दुलने नदीम खान आणि गुड्डू यांनी आई-वडिलांच्या हत्येची सुपारी दिली. याबदल्यात अडीच लाख रुपये देण्याचं आश्वासनही दिलं.

अब्दुलने दोघांनाही आपल्या घरी बोलावून घेतलं. आई-वडिल झोपेत असतानाच तिघांनी हल्ला करत त्यांची हत्या केली. तपासादरम्यान अब्दुने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथीदारांना अटक केलं आहे.