गुरुग्राम पोलिसांनी व्यवसायिक भागीदार आणि आपल्या पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने आत्महत्येचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. आरोपी हरनेक सिंह याने पत्नीची हत्या केल्यानंतर आत्महत्या करण्याचा बनाव केला होता. पण नंतर त्याने गुन्हा कबूल करत आपण पत्नी आणि मित्र जसकरन सिंहची हत्या केल्याचं मान्य केलं.

गुरुग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हरनेक याने जसकरनकडून 40 लाख रुपये उधार घेतले होते आणि पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. 14 ऑक्टोबरला जसकरन हरनेकच्या घऱी आला होता. हरनेकने पत्नी आणि मित्राच्या सहाय्याने जसकरनला घरात कोंडून ठेवलं आणि हत्या केली’.

‘हत्या केल्यानंतर विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी मृतदेहाचे 25 तुकडे केले आणि दोन बॅगेत भरले. यानंतर त्यांनी कारमधून लुधियानाच्या दिशेने प्रवास सुरु केला. प्रवासात आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी बॅग टाकून दिल्या’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हत्या केल्यानंतर हरनेकला पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील याची भीती वाटत होती. यासाठी त्याने पत्नीसोबत आत्महत्या करण्याचा प्लान केला. पण पत्नी गुरमेहरने यासाठी नकार दिला. यामुळे चिडलेल्या हरनेकने 22 ऑक्टोबरला पत्नीची गळा कापून हत्या केली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने स्वत: हातावर वार करुन घेतले.

यानंतर आरोपीने पोलिसांना घरात चोरी झाल्याची खोटी गोष्ट सांगितली. तसंच चोरांनीच पत्नीची हत्या केल्याचा दावा केला. पण पोलीस त्यांच्या उत्तरावर समाधानी नव्हते. कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी अटक करुन आरोपी हरनेकला न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली.