एखाद्या कैद्याला तब्बल २४२ वर्षांची शिक्षा झाल्याचं कोणी ऐकलंय? असं वाचून एखादी व्यक्ती म्हणेल हे खोटं आहे. पण नाही, हे अगदी खरं आहे. युटामधील फर्मिंगटनमध्ये राहणाऱ्या एका ट्रक चालकाला चक्क २४२ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अनेक महिलांसह बलात्कार, किडनॅपिंग आणि लूट असे अनेक आरोप या व्यक्तीवर ठेवण्यात आले आहे. तब्बल ३० वर्षे त्याचा हा प्रकार सुरू होता. फेब्रुवारी महिन्यात त्याच्यावर बलात्काराचे ८, किडनॅपिंगचे ६ आणि लूट याअंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.

दरम्यान, त्यानं न्यायालयासमोर माफी मागण्याचाही प्रयत्न केला. “आपण जे काही केलं त्याचा आपल्याला पश्चाताप होत आहे. ज्यांच्यासोबतही मी ते कृत्य केलं त्यांची मी माफी मागतो. माझा गुन्हा माफी मागितल्यानंतर कमी होणार नाही. दोषी ठरवलं जाणं आणि तुरूंगात जाणं माझ्या कृत्यांसाठी कमी आहे,” असंही तो न्यायालयासमोर म्हणाला. यानंतर न्यायालयानं त्याला तब्बल २४२ वर्षांची शिक्षा ठोठावली.

६९ वर्षीय मार्क बन्स हा एक ट्रक चालक आहे. दरम्यान, तपासकर्त्यांकडून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जेव्हा तो बाहेर होता त्यावेळी तो लपून एखाद्या महिलेच्या घरात शिरायचा आणि त्यांचा बलात्कार करायचा. अनेकदा त्यानं त्यांना मारण्याची धमकी देऊनही दुष्कृत्य केल्याचं त्यांची सांगितलं. १९९२ मध्ये त्यानं ११ वर्षीय मुलीचादेखील बलात्कार केला होता. त्यानंतर अनेकदा त्यानं असं कृत्य केल्याचंही तपासकर्त्यांनी सांगितलं.