भारत सरकारकडून शनिवारी संध्याकाळी यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये अयोध्येतील मोहम्मद शरीफ यांच्या नावाचाही समावेश आहे. शरीफ हे गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही धार्मिक भेदभावाविना बेवारस मृतदेहांवर अत्यंसंस्कार करीत आहेत. त्यांच्या या माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या कामाची आज देशपातळीवर दखल घेतली गेली आहे.

देशात अनेकदा धार्मिक कारणांवरुन संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, हे सर्व निरर्थक असल्याचा विचार करायला लावणारं मोहम्मद शरीफ हे व्यक्तीमत्व आहे. कोणाच्याही धर्मापेक्षा माणूस त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. त्यांच्यासाठी मरणानंतरही माणसाचा सन्मान महत्वाचा असल्याने त्यांनी स्वतःला या कामात गुंतवूण घेतलं आहे. अखेर त्यांच्या या निरंतर सेवेची दखल घेऊन सरकारनेही त्यांना देशातील मानाच्या नागरी पुरस्कारानं गौरविलं आहे.

आपल्या या कामाबद्दल सांगताना शरीफ म्हणाले, “२७ वर्षांपूर्वी सुल्तानपूरमध्ये माझ्या मुलाची हत्या झाली होती. त्यानंतर मला याबाबत एक महिन्यानंतर कळालं. या घटनेनंतर मी बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे काम सुरु केले. आजवर मी ३००० हिंदू मृतदेहांवर तर २५०० मुस्लिमांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.”