सध्या देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक ठिकाणी उद्योगधंदेही ठप्प आहेत. परंतु अशा परिस्थितीतही एका व्यक्तीनं सायकलवरून एक हजार किलोमीटरचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला. परंतु झालं असं की त्याला आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच क्वारंटाइन व्हावं लागलं.

उत्तर प्रदेशातील गावात राहणाऱ्या एका व्यक्तीचं लॉकडाउनमुळे लग्न होऊ शकलं नाही. तो पंजाबमधईल लुधियाना परिसरात टाइल्सचं काम करत होता. लॉकडान दरम्यान जेव्हा काम बंद झालं त्यावेळी त्याला आपल्या घराची ओढ निर्माण झाली. तसंच १५ एप्रिल रोजी त्याचं लग्नही होणार होतं. त्याच्या राहत्या गावापासून जवळपास २५ किलोमीटर अंतरावर त्याचं लग्न होणार होतं.

त्यानं आपल्या काही मित्रांसह सायकलवरून गावी जाण्याचा निर्णय घेतला. सहा दिवसांमध्ये त्यानं तब्बस ८५० किलोमीटरचं अंतर पार केलं आणि तो बलरामपुर या गावी पोहोचला. पण आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी थांबवलं आणि पुढे जाण्याची परवानगी दिली नाही. यानंतर त्याच्यासह त्याच्या मित्रांची रवानगी क्वारंटाइन सेंटरमध्ये करण्यात आली. लग्नाचं कारण सांगत त्यानं पोलिसांकडे जाऊ देण्याची मागणी केली परंतु पोलिसांनी त्याला जाण्याची परवानगी दिली नाही.