काश्मीर खोऱ्यातील बडगाम जिल्ह्य़ात सोमवारी पोलिसांच्या ताफ्यावर सशस्त्र दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात एक पोलीस अधिकारी शहीद झाला तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह तिघे गंभीर जखमी झाले.
श्रीनगरपासून १६ किमी अंतरावरील गजबजलेल्या चादूरा चौकात सोमवारी दुपारच्या सुमारास  सशस्त्र गटाने गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात चादूरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाबिर अहमद, हवालदार मोहम्मद शफी आणि फिरदौस अहमद या पोलीस कर्मचाऱ्यांसह गुलाम मोहम्मद हा दुकानदारही जखमी झाला. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गोळ्या वर्मी लागून अति रक्तस्राव झाल्यामुळे पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली. या घटनेनंतर हल्लेखोर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही.