बिहारमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर तिचं मुंडन करत गावात धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंचायतने मुलीला ही शिक्षा सुनावली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. १४ ऑगस्ट रोजी काहीजणांनी मिळून पीडित मुलीचं अपहरण केलं होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे.

तरुणीवर जबरदस्ती करत तिला स्थानिक पंचायतीच्या इमारतीवर नेण्यात आलं. पीडित तरुणी बेशुद्द पडेपर्यंत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. दुसऱ्या दिवशी एका गावकऱ्याने तरुणीला पाहिल्यानंतर तिच्या कुटंबियांना कळवलं. यानंतर तिला घरी आणण्यात आलं. गावात वचक असल्या कारणाने पंचायतीने आरोपींना शिक्षा सुनावण्याऐवजी पीडित मुलीलाच शिक्षा सुनावली.

यानंतर पीडित तरुणीचं मुंडन करण्यात आलं आणि गावात तिची धिंड काढण्यात आली. घटनेच्या ११ दिवसानंतर सोमवारी याप्रकरणी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. पीडित तरुणी आणि तिच्या आईने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतरच हा एफआयआर दाखल करण्यात आला. याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

“पंचायतीच्या पाचही सदस्यांनादेखील आरोपी करण्यात आलं असून पॉस्कोअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपींपैकी एकाची ओळख पीडितीने पटवली असून त्यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. इतर आरोपींची ओळख पीडित तरुणी अद्याप पटवू शकलेली नाही”, अशी माहिती मोहनपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी रवीभूषण यांनी दिली आहे.

बिहार महिला आयोगाच्या प्रमुख मिश्रा यांनी या घटनेची दखल घेत वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना यासंबंधी सविस्तर अहवाल तयार करत २ सप्टेंबरच्या आधी सर्व पंचायत सदस्यांना आयोगासमोर हजर करण्यास सांगितलं आहे.