बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर वडिलांसमोरच सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 4 फेब्रुवारीला किशनगंज येथे ही घटना घडली. आरोपींनी पीडित मुलीच्या वडिलांना झाडाला बांधलं आणि त्यांच्यासमोरच बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा करत आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकारी आशिष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रात्री सहा जणांनी घराचा दरवाजा ठोठावला. त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितलं आणि घरात घुसले. आरोपींनी मुलीला आणि तिच्या वडिलांना फरफटत बाहेर नेलं आणि गावाबाहेर निर्जनस्थळी घेऊन गेले’.
आरोपींनी मुलीच्या वडिलांना मारहाण केली आणि झाडाला बांधून ठेवलं. यानंतर आरोपींनी वडिलांसमोरच मुलीवर बलात्कार केला. एफआयआरमध्ये सर्व आरोपींच्या नावाची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती आशिष कुमार यांनी दिली आहे. घटनेनंतर गावकऱ्यांनी मुलीच्या कुटुंबीयांना हे प्रकरण आपापसात मिटवा असं सांगत पोलिसांपर्यंत न जाण्याचा सल्ला दिला होता. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला असून सर्व आरोपींचा शोध घेतला जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 7, 2019 6:03 pm