रुग्णालय, ग्रंथालय, संग्रहालयाचा समावेश

लखनऊ : रामजन्मभूमी प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता तेथे सरकारने दिलेल्या पाच एकर जमिनीवर बाबरी मशिदीच्या आकाराएवढीच मशीद बांधण्यात येणार आहे, असे मशिदीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

अयोध्येतील धन्नीपूर खेडय़ात हे संकुल असून त्यात रुग्णालय, ग्रंथालय, संग्रहालय यांचा समावेश करण्यात येणार आहे. निवृत्त प्राध्यापक व अन्न समीक्षक पुष्पेश पंत हे संग्रहालयाचे अभिरक्षक असणार आहेत.

इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनचे सचिव व प्रवक्ते अथर हुसेन यांनी सांगितले की, मशिदीचे संकुल धन्नीपूर येथे उभारण्यात येणार आहे. तेथे रुग्णालय, संग्रहालय, इंडो-इस्लामिक संशोधन केंद्र असेल. उर्वरित जागेवर इतर सुविधा असतील. पुष्पेश पंत यांनी तेथील संग्रहालयाचे अभिरक्षक म्हणून काम करण्याचे कालच मान्य केले आहे. उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ मंडळाने मशीद उभारणीसाठी इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन या ट्रस्टची स्थापन केली असून पाच एकर जागेवर मशिदीचे संकुल असणार आहे.

हुसेन यांनी सांगितले की, जामिया मिलीया इस्लामियाचे प्रा. एस.एम अख्तर हे सल्लागार स्थापत्य विशारद म्हणून काम करणार आहेत. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्यातील धन्नीपूर खेडय़ात मशिदीसाठी पाच एकर जागा दिली असून तेथे मशीद उभारली जाणार आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद कारसेवकांनी पाडली होती. दरम्यान न्यायालयाच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट रोजी राममंदिराचे भूमिपूजन केले होते.