घरातील गॅलरीमध्ये बसून चहाचे घोट घेत बाहेर पडणारा पाऊस पहायला सर्वांनाच आवडते. मात्र याच पावसात ऑफिसला जायचं म्हटलं की अनेकांना नकोसे होते. मुंबईसारख्या शहरामध्ये तर जरा अधिक पाऊस पडला तर लाखो चाकरमानी ऑफिसमध्ये अडकून पडतात. अनेकदा पावसाळ्यात पाणी साठल्याने, वाहतुककोंडी झाल्याने, लोकल ट्रेन्स बंद पडल्याने काही मिनिटांच्या प्रवासासाठी अनेक तासांचा प्रवास करावा लागतो तेव्हा कुठे मुंबईत कामासाठी येणारा व्यक्ती घरी पोहचते. अनेकदा तुंबणारी शहरे आणि अडकणारे कर्मचारी यावरुन सरकारवर टिका केली जाते. अनेकदा टिका होऊनही या समस्येवर वर्षानुवर्षे काहीच ठोस उपाय शोधला जात नाही. मात्र ऑस्ट्रेलियातील सरकारने तेथील कर्मचारी घरी जाताना पावसात अडकून पडून त्यांना त्रास होऊ नये म्हणून विशेष नियम केले आहेत. अधिक पाऊस असेल किंवा तापमान एक अंश सेल्सियसपेक्षा कमी झाले तर कर्मचारी ऑफिसमधून हवं तेव्हा घरी जाऊ शकतात असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

सध्या ऑस्ट्रेलियामधील हवामान अत्यंत खराब आहे. देशात वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोळत आहेत. तर काही ठिकाणी अनेकदा तापमानात अचानक घट होताना दिसत आहे. प्रंचड थंड वारे ऑस्ट्रेलियात वाहत असून त्या सोबतीला काही ठिकाणी गारांचा वर्षावही होत आहे. त्यामुळेच अशा वातावरणाचा सर्वाधिक फटका ऑफिसला जाणाऱ्यांना बसत आहे. ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे होणारे हाल लक्षात गेऊन ऑस्ट्रेलियातील कार्यायलयीन कामासंबधीत निर्णय घेणाऱ्या न्यायाधिकरणाने पाऊस तसेच तापमान कमी झाल्याने हवामानातील बदल हानीकारक वाटू लागल्यास कर्मचाऱ्यांना कोणत्याही क्षणी घरी जाण्याची मुभा दिली आहे. २०१० साली करण्यात आलेल्या कायद्यानुसार महिनाभर खराब हवामानामुळे ऑफिसमध्ये जाऊन काम करणे शक्य झाले नाही तरीही कर्मचारी ३२ तासांच्या पगाराची मागणी कंपनीकडे करु शकतात.

अचानक हवामान खराब झाल्यास कर्मचाऱ्यांच्या रहायची तसेच खाण्याची सोय कंपन्यांनी करण्याचा नियमही ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तसेच हवामान खराब असताना बाहेर जाऊन काम करण्यास कर्मचारी नकार देऊ शकतात. मात्र खराब हवामानामध्ये कंपनीने सुट्टी देण्याऐवजी कर्मचाऱ्यांना इतर सुरक्षित ठिकाणी काम करण्यास सांगितले तर कर्मचाऱ्यांना ऑफिसला यावेच लागेल असंही या नियमांमध्ये म्हटले आहे.

पावसामध्ये सिमेंट काँक्रिटचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार देण्याचा नियमही ऑस्ट्रेलियामध्ये आहे. बांधकाम, वनविभाग, समुद्राशी संबंधित बांधकाम आणि निर्माण क्षेत्र, खाणकाम आणि उर्जा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू होतो. मात्र याव्यतिरिक्त इतर क्षेत्रात म्हणजे ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांसाठी दुप्पट पगार देण्याचा नियम लागू होत नाही.