हो, हे खरे आहे. ‘इथल्या’ पाकिस्तानमधील नागरिकांची नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा आहे. मात्र, हा पाकिस्तान म्हणजे आपला शेजारी देश नसून बिहारच्या पुर्णिया जिल्ह्यातील एक गाव आहे.
पुर्णिया जिल्ह्यात पाकिस्तान नावाचे गाव आहे. केवळ २५० लोकसंख्या असलेल्या या गावात जवळपास शंभर मतदार आहेत. मोदींचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी या नागरिकांनी भाजपला मतदान करण्याचे ठरविले आहे.
गावातील नागरिकांचे मोदींबद्दल मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता येथील हिरा नामक गावकऱयाने ‘आम्हाला नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदी हवे आहेत’ असे अगदी ठणकावून सांगितले. मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या या गावात दारिद्र्याचे प्रमाण अधिक आहे. पुर्णियापासून ३० किलोमीटर अंतरावर संघिया पंचायतीमध्ये पाकिस्तान नावाचे हे गाव आहे. येत्या २४ एप्रिल रोजी येथे मतदान होणार आहे. विशेष म्हणजे, या पाकिस्तानात एकही मुस्लिम कुटुंब आणि मस्जिद नाही. संथाल आदीवासी जमातीचे लोक येथे राहतात. मोदीच देशाचे पंतप्रधान व्हावेत, तेच काहीतरी करू शकतात असे येथील गावकऱयांचे मत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावाची कागदोपत्री नोंद पाकिस्तान अशीच आहे. १९४७ सालच्या भारत-पाकिस्तान विभाजनानंतर गावाला पाकिस्तान नाव पडल्याचे गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात.