पाकिस्तानच्या एका हेलिकॉप्टरने भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचे वृत्त आहे. भारतीय प्रदेशाची टेहळणी करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानकडून हे कृत्य करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, भारतीय जवानांच्या ही बाब ध्यानात आल्यानंतर त्यांनी या हेलिकॉप्टरच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, त्यानतंर हे हेलिकॉप्टर पुन्हा पाकिस्तानच्या हद्दीत परतले. जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागात हा प्रकार घडला.

आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असलेल्या संयुक्त राष्ट्र संघामध्ये दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचे काम कालच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केले होते. मात्र, त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज पाकिस्तानने भारतीय हद्दीत आपले हेलिकॉप्टर घुसवण्याचे धाडस केले आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील गुलपूर सेक्टरमध्ये दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास हे हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत फिरताना दिसले. याचा व्हिडिओही चित्रीत करण्यात आला आहे. या व्हिडीओत आपल्या सुरक्षा रक्षकांकडून हेलिकॉप्टरच्या दिशेने करण्यात आलेल्या गोळीबाराचा आवाजही ऐकू येतो. हा भाग दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे.

जितक्या उंचीवर हे हेलिकॉप्टर होते त्यावरुन संशय व्यक्त करण्यात येत आहे की, ते या भागाची टेहळणी करायला आले होते. नियमांनुसार, रोटरवाले कोणतेही विमान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या एक किमी जवळ येऊ शकत नाही. तर विनारोटरवाले दुसरे कोणतेही विमान सीमेच्या १० किमीच्या जवळ येऊ शकत नाही.