तब्बल १६ वर्षे वाराणसीतील कारागृहात कैद असलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाची सुटका करण्यात आली आहे. जलालुद्दीनला १६ वर्षांपूर्वी संशयित दस्तऐवजासह वाराणसी छावणी परिसरातून अटक करण्यात आली होती. त्याला रविवारी कारागृहातून सोडण्यात आले. त्याने जाताना आपल्याबरोबर भगवद्गीताही पाकिस्तानला नेली आहे. वाराणसी मध्यवर्ती कारागृहातील वरिष्ठ अधिकारी अंबरिश गौड यांनी जलालुद्दीनला २००१ मध्ये पकडण्यात आल्याचे माध्यमांना सांगितले.

जलालुद्दीन हा पाकिस्तानातील सिंध प्रांतातील आहे. त्याला वाराणसी छावणीतून काही संशयित कागदपत्रांसह पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी त्याच्याकडून काही मानचिन्ह ही जप्त केले होते. न्यायालयात त्याला सादर केल्यानंतर सुनावणी झाली आणि १६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

गौड पुढे म्हणाले की, ऑफिशयल सिक्रेट अॅक्ट अँड फॉरेन अॅक्ट अंतर्गत त्याला कारागृहात पाठवण्यात आले होते. त्याला स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. त्याने पाकिस्तानला जाताना आपल्याबरोबर भगवद्गीता नेली आहे. जेव्हा त्याला अटक करण्यात आली तेव्हा तो पदवीचे शिक्षण घेत होता.

त्याने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून (इग्नू) एमए केले आहे. त्याचबरोबर कारागृहातच इलेक्ट्रिशियनचा कोर्सही केला आहे. त्याने कारागृहात तीन वर्षे क्रिकेट लीगमध्ये पंचाचे काम ही पाहिले होते. एका विशेष पथकाने त्याला अमृतसरला नेले. तिथे वाघा-अट्टारी सीमेजवळ संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येईल. तेथून तो पाकिस्तानला जाईल.