बिहारमधील सरकारी रुग्णालयात सर्जरीदरम्यान ऑपरेटिंग टेबल तुटल्याने महिला रुग्णाचा खाली पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टेबलवरुन खाली पडल्याने आधीच शारिरीक त्रास सहन करणा-या महिला रुग्णाला गंभीर जखमा झाल्या होत्या. ऑपरेशन करणा-या डॉक्टरचंही बोट यामध्ये फ्रॅक्चर झाल्याचं कळत आहे.

पाटणा मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक विभागात हा प्रकार घडला. घटनेला आठवडा उलटला असून, उशिराने प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारी खातून यांच्या पाठीचा कणा दुखावला असल्याने सोमवारी त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये आणण्यात आलं होतं. त्यांच्यावर सर्जरी करण्यात येणार होती. यावेळी त्यांना ऑपरेशन टेबलवर असताना कूस बदलण्यास सांगण्यात आलं. मात्र त्या हालचाल करत असतानाच अचानक टेबल मधून तुटला आणि त्या खाली जमिनीवर पडल्या ज्यामुळे त्यांना गंभीर जखमा झाल्या.

कनिष्ठ निवासी डॉक्टर बी एन चतुर्वेदी ही सर्जरी करत होते. या दुर्घटनेत त्यांचं बोट फ्रॅक्चर झालं असून, त्यांच्या पायालाही जखम झाली आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे त्यांना ऑपरेशन थांबवावं लागलं. त्यांनी घटनेची माहिती आणि तक्रार वरिष्ठांकडे केली आहे. रुग्णालय अधिक्षकांकडे केलेल्या लेखी तक्रारीत ऑपरेशन टेबल खरेदी केल्याच्या एका वर्षातच तुटल्याचं त्यांनी म्हटलं आहे.