पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बोलण्यासाठी मला १५ मिनिटे द्या, पंतप्रधानांचा माझ्यासमोर टिकाव लागणार नाही असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. या वक्तव्याचा समाचार भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी घेतला आहे. काँग्रेसचा शहजादा अशी प्रतिमा असलेले राहुल गांधी हे मोबाइल पाहिल्याशिवाय दोन वाक्ये लिहू शकत नाहीत. १५ वाक्ये लिहायची असतील तरीही ती त्यांना जमणार नाहीत अशात त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर १५ मिनिटे बोलायचे आहे, असे म्हणत त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.

राफेल विमान खरेदीच्या करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अनेकदा केला आहे. तसेच इतर काँग्रेस नेत्यांनीही नरेंद्र मोदींनी राफेल करारात घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. अशात काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी मी फक्त १५ मिनिटे बोललो तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यासमोर काहीही बोलू शकणार नाहीत असे म्हटले होते त्यावर आता भाजपाने त्यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. ‘टाइम्स नाऊ’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

फाळणीची किंमत देशाला मोजावी लागली त्यानंतर पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान झाले. आणीबाणीचा फटका देशाला बसला त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना शिखांची हत्या करण्याची संमती दिली. आता शहजादा राहुल गांधी आमच्यावर टीका करत आहेत. काँग्रेसचा विश्वास निवडणुकांवर नाही, निवडणूक आयोगावर नाही, घटनेवर नाही, पंतप्रधान कार्यालयावरही नाही आणि ईव्हीएम मशीन्सवरही नाही. जेव्हा काँग्रेसने निवडणुका जिंकल्या की ईव्हीएममध्ये काहीही प्रश्न नसतो, घटना योग्य असते, कोणावरही अत्याचार होत नाही. काँग्रेस हरल्यावर सगळे चुकीचे असते, देशात काहीही चांगले घडत नाही अशी खोचक टीका पात्रा यांनी केली.