अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद भूमीचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू आणि मुस्लीम यांच्यात सुरू आहे. या जमिनीवर दोन्ही समाजांनी आपापला दावा केला आहे. आता यात बौद्ध समाजानेही उडी घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून अयोध्येतील वादग्रस्त भूमीवर बौद्ध समाजाने आपला हक्क सांगितला आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही याचिका ६ मार्च २०१८ रोजी विनीतकुमार मौर्या यांनी दाखल केली आहे. विनीत हे अयोध्येत राहतात. ते म्हणाले की, मी बौद्ध समाजाचा सदस्य आहे. बौद्ध धर्मानुसारच मी येथे जीवन व्यतीत करत आहे. बौद्ध लोकांना न्याय मिळावा यासाठी मी ही याचिका दाखल केली असून सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला निश्चितच न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बौद्ध समाजाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे की, भारतीय पुरातत्व विभागाने या जमिनीचे चारवेळा खोदकाम केले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाच्या आदेशानंतर २००२-२००३ मध्ये तिथे शेवटचे खोदकाम करण्यात आले होते. बाबरी मशीद होण्यापूर्वी येथे बौद्ध समाजाचे स्मारक होते. भारतीय पुरातत्व विभागाने या जागेवर खोदकाम करताना बौद्ध धर्माशी निगडीत स्तूप, भिंती आणि खांब आढळून आले होते. या जागेवर बौद्ध विहार होते, असा दावा विनीतकुमार यांनी केला आहे.

दरम्यान, भारतीय पुरातत्व सर्व्हेने २००३ मध्ये म्हटले होते की, वादग्रस्त जागी एक गोलाकार पूजास्थळ आढळून आले. त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने यासंबंधीत पुरावे गोळा करण्यास सांगितले होते. वादग्रस्त स्थळातील कसोटी स्तंभ वाराणसी येथे असलेल्या बौद्ध स्तंभाप्रमाणे आहे, असे न्यायालयाने म्हटले होते.