मुंबईच्या हाजीअली दर्ग्यात आणि केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशाचा समान अधिकार देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता दिल्लीच्या निजामुद्दीन औलिया दर्ग्यातही महिलांना प्रवेश देण्याची मागणी जोर धरत आहे. यासंबंधी दिल्ली हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये महिलांना दर्ग्यात आतल्या खोलीपर्यंत जाण्याची परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे.


निजामुद्दीन दर्ग्यामध्ये महिलांनाही प्रवेश देण्याच्या मागणीबाबत कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या एका महिला विद्यार्थीनीने ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत केंद्र आणि संबंधित प्रशासनाला या दर्ग्यात महिलांना प्रवेशाचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की, या दर्ग्याच्या बाहेर एक नोटीस लावण्यात आली आहे. यामध्ये ‘महिलांना प्रवेश बंद’ असे लिहिले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी याबाबत संबंधित प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र, यावर त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. महिलांना येथे प्रवेश नाकारणे हे असंविधानिक असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. तसेच यासंबंधी अजमेर शरीफ, हाजीअली दर्ग्याचे उदाहरण समोर ठेवले. या ठिकाणी महिलांना आतपर्यंत प्रवेशाचा अधिकार मिळाला आहे. दिल्ली हायकोर्टात या प्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

याचिकाकर्त्यांनी याप्रकरणी शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशाचा समान अधिकार देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचाही उल्लेख केला आहे. दरम्यान, विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे येथे गर्भगृहात महिलांना अद्याप प्रवेश करण्यात यश आलेले नाही.