तेलंगणा सरकार गेल्या काही दिवसांपासून माकडांमुळे त्रस्त झाले आहे. या माकडांपासून सुटकेसाठी सरकारने तब्बल ३० कोटींची योजना बनवली आहे. ही योजना वन विभागाकडून तयार करण्यात आली असून सरकारकडे ती सादर करण्यात आली आहे.

इतकंच नव्हे तर सरकारने माकडांपासून सुटकेसाठी वन मंत्री जोगू रामण्णा यांच्या शिफारशी नंतर एक विशेष समितीही नियुक्त केली आहे. सोमवारी वन भवनात आयोजित समितीच्या पहिल्या बैठकीत राज्यातील शेतकरी आणि लोकांसमोर माकडांपासून वाचण्यासाठी एक योजना सुरू करण्यात आली. बैठकीत विभागाचे प्रमुख मुख्य संरक्षक पी. के. झा यांनीही भाग घेतला होता. समितीने बनवलेल्या योजनेसाठी ३० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.

राज्यातील पिकांना माकडांपासून मोठी धोका आहे. आदिलाबाद, निर्मल, मंचेरियाल आणि असिफाबाद सारख्या जिल्ह्यांमध्ये माकडांकडून पिकांची नासाडी केली जाते. तसेच लोकांवर हल्लेही केले जात असल्याचे समोर आले आहे.

ग्रामीण भागासह शहरातही माकडांची समस्या असल्याचे सरकारला लक्षात आले आहे. या समस्येवर त्वरीत तोडगा काढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात या मुद्यावर चर्चा केली होती. त्यांनी हा मुद्या मार्गी लावण्यासाठी इतर विभागांशी समन्वय साधून काम करण्याची अधिकाऱ्यांना सूचना केली होती.