आज देशभरात भ्रष्टाचाराची नवनवी प्रकरणं समोर येत असून प्रत्येकजण आपल्या मुलाला, वडिलांना किंवा नातलगाला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र मध्य प्रदेशात एका अधिकाऱ्याने कर्तव्यापुढे आपल्या वडिलांनाही सोडलं नाही. नियमाचं पालन न केल्याबद्दल अधिकाऱ्याने आपल्या वडिलांनाच दंड ठोठावला. आपल्या वडिलांविरोधात कायदेशीर कारवाई करणाऱ्या या अधिकाऱ्याचं सध्या कौतूक केलं जात आहे.

उमरिया जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. सुबेदार पदावर असणाऱ्या अखिलेश सिंह यांनी कर्तव्य बजावत असताना फक्त आपल्या वडिलांची गाडी थांबवली नाही तर काचेवर बेकायदेशीरपणे लावण्यात आलेली काळ्या रंगाची फिल्मही काढून टाकली. विशेष म्हणजे अखिलेश सिंह यांचे वडील आरबी सिंह कटनी येथील बोहरीबंद तालुक्याचे एसडीओ आहेत.

यामुळे कारवाई करताना इतर कर्मचारी थोडे धास्तावलेले होते. मात्र अखिलेश सिंह यांनी नियमाचं पालन करत कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यांनी कारवाई करताना कोणताही भेदभाव केला जाऊ नये असं स्पष्ट केलं. अखिलेश सिंह यांनी स्वत: काचेवरील काळी फिल्म काढून टाकली. मुलगा कारवाई करत असल्याचं पाहून आर बी सिंह यांनीदेखील रोखलं नाही. त्यांनी 500 रुपयांचा दंडही भरला. आरबी सिंह उमरिया येथे आपल्या नातींना भेटण्यासाठी जात असताना ही कारवाई झाली.