नोट छापण्याची मशीन विकण्याचं अमिष दाखवत पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची 46 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये ही घटना घडली आहे. नोट छापण्याची मशीन विकत घेण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाने मित्र आणि नातेवाईकांकडून पैसे उधार घेतले होते. पण आरोपींनी 46 लाख घेऊन पळ काढला आणि आपली फसवणूक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. दोघे आरोपी मुंबईचे रहिवासी आहेत.

काही दिवसांपूर्वी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मुलगा बेपत्ता झाला असल्याचं समोर आलं होतं. यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु कऱण्यात आलं. अखेर वृंदावन येथे मुलाचा शोध लागला. भीतीपोटी ते तिथे लपून बसला होता. चौकशी केली असता त्याने घडलेला प्रकार सांगितला आणि आपली दोघांनी फसवणूक केली असल्याची माहिती दिली.

अटक कऱण्यात आलेल्या आरोपींची नावे विमल राजेश पाटील आणि सुरज कुमार आहेत. दोघेही एका गँगचा भाग आहेत. ही गँग देशभरात सक्रीय असून नोट छापण्याची मशीन विकण्याचं अमिष दाखवत लोकांची फसवणूक करते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकदा पैसे मिळाले की गँग मशीन खराब झाली असल्याचं सांगत अजून थोडा वेळ देण्याची विनंती करते आणि पसार होते.

आरोपी विमल पाटील आणि सुरज कुमार यांनी दिल्ली न्यायालयात हजर केला असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पीडित तरुणाने लोकांकडून पैसे उधार घेतले असल्याने भीतीपोटी पळ काढला होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.