मदुराईमधील मेलूर येथील मंदिरातून १९१५ साली ७०० वर्ष जुनी देवाची मुर्ती चोरीला गेली होती. नुकतंच एका जुन्या घरातून ही मुर्ती हस्तगत करण्यात आली आहे. १०० वर्षांपुर्वी ज्या व्यक्तीने ही मुर्ती चोरली होती, त्याने घऱाच्या भिंतीत ही मुर्ती लपवून ठेवली होती. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ७०० वर्ष जुनी ही मुर्ती मंदिरामधील दोनपैकी एका पुजाऱ्याने चोरली होती. करुप्पास्वामी असं त्या पुजाऱ्याचं नाव होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील दुसऱ्या पुजाऱ्याशी झालेल्या वादानंतर करुप्पास्वामी यांनी मुर्ती चोरली होती. त्यावेळी ब्रिटीश पोलिसांकडे मुर्ती चोरी झाल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. करुप्पास्वामी यांच्या नातवाने आपल्या आजोबांनी केलेली चूक सुधारण्याचं ठरवलं आहे. ही मुर्ती चोरल्यामुळे आपल्या कुटुंबाला अनेक यातना सहन कराव्या लागल्या असं त्यांचं म्हणणं आहे.

करुप्पास्वामी यांचे ६० वर्षीय नातू मुरुगेसन सांगतात की, ‘जवळपास १०० वर्षांपुर्वी ही मुर्ती चोरण्यात आली. तेव्हापासून आमच्या अनेक पिढ्यांनी त्रास सहन केला. देवाचा कोप झाल्याने कुटुंबातील अनेकांचा मृत्यूही झाला’. सहा महिन्यांपुर्वी मुरुगेसन यांनी खुलासा करत सांगितलं की, मुर्ती चोरली तेव्हापासूनच ती भिंतीत लपवून ठेवण्यात आली होती. आजोबा नेहमी भिंतीसमोर प्रार्थना करत असल्याने मुरुगेसन यांना संशय आला होता. यानंतर त्यांनी मुर्तीची माहिती मिळाली.

दीड फुटांची ही मुर्ती हस्तगत करण्यात आली असून पुढील महिन्यात होणाऱ्या वार्षिक उत्सवादरम्यान पुन्हा एकदा मंदिराकडे सोपवली जाणार आहे. मेलुर येथील हे मंदिरही ८०० वर्ष जुनं आहे.