हिंदू धर्माचा अभिमान बाळगणाऱ्यांचे दिल्लीवर ८०० वर्षांनंतर राज्य आले आहे, असे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी करत, शाळांमध्ये संस्कृत अनिवार्य करण्याची मागणी केली.
येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या जागतिक हिंदू परिषदेत (काँग्रेस) सिंघल यांनी भाजपच्या विजयाचा अप्रत्यक्ष उल्लेख करत अजून अनेक बाबी अनिवार्य कराव्या लागतील असे सूचित केले. पृथ्वीराज चौहान यांनी ८०० वर्षांपूर्वी दिल्लीवर राज्य केले. त्यानंतर आता हिंदू धर्माबाबत अभिमान बाळगणाऱ्यांचे राज्य आल्याचे सिंघल यांनी सांगितले. संस्कृत ही आपली भाषा आहे. हजारो वर्षांपूर्वी संस्कृतमधूनच लिहिले जात. त्यामुळे तेच जर तुम्ही नष्ट करू पाहाल तर देश कसा टिकणार, असा सवाल सिंघल यांनी केला.
हिंदूंनी एकजूट दाखवावी, असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. जगात भारतीय मुल्यांची महती आहे. दोन हजार वर्षांत विविध प्रारूप (मॉडेल्स) पडताळली गेली आता हिंदू मूल्ये दाखवून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.