तीन दिवसांपूर्वी केबीसीच्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासमोर हरियाणामधील एक तरुण बसला होता. मदाना खुर्द गावातून आलेल्या ऋषी राजने यावेळी १२ लाख रुपयेही जिंकले. परंतू, त्याच्या गावातील कोणत्याच व्यक्तीने याबाबत आनंद व्यक्त केला नाही. असे का घडले? तर २०११च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेल्या झाज्जर येथील मदाना गावात अद्यापही स्त्री भ्रुणहत्या आणि बालहत्या होत असल्याचे केबीसीमध्ये दाखविण्यात आले होते. याची साक्ष देणाऱ्या एका फलकाचे छायाचित्रही कार्यक्रमादरम्यान दाखविण्यात आले होते. या फलकावर ५०० रुपयात गर्भपात करा आणि पाच लाख रुपयांचा हुंडा वाचवा असे लिहलेले होते. दरम्यान, व्हिडिओमध्ये हा फलक दाखविला जात असताना फलकाचा खालील भाग धुसर करण्यात आला होता. ध्वनीमुद्रणात या फलकावरील लेखनामागे भरपूर गोष्टी दडलेल्या आहेत असे म्हटले गेले होते.
केबीसीमध्ये सदर व्हिडिओ पाहताच इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राच्या पत्रकारांनी मदाना खुर्द आणि त्याच्याच बाजूला असलेल्या मदाना कालन गावांनी भेट दिली. मात्र, त्यांना तिथे हे फलक दिसले तर नाहीचं पण अशाप्रकारचे कोणतेही फलक गावात दूरदूरपर्यंत लावण्यात न आल्याचे कळले. इतकेच नाही तर केबीसीतील व्हिडिओमध्ये मदानातील नागरिक म्हणून दाखविण्यात आलेल्या दोन व्यक्तींबद्दल आपल्याला माहिती नसल्याचे गावक-यांनी आणि ऋषी राजच्या कुटुंबियांनी सांगितले. तसेच, व्हिडिओत दाखविण्यात आलेली तिसरी व्यक्ती दीप चंद ही मदाना खुर्दमधीलच असून, त्याने गावात स्त्री भ्रुणहत्या आणि बालहत्येचे प्रकार घडत नसल्याचे केबीसीच्या टीमला तेव्हाच सांगितले होते. तसेच, याबाबत काहीही चुकीची माहिती देऊ नये असे तो त्यांना म्हणाला होता. तरीही, या गावात मुलगी जन्माला आल्यावर तिच्या लग्नात हुंडा द्यावा लागतो म्हणून कोणालाच मुलगी जन्माला यावी असे वाटत नाही. मुलगा जन्माला आला तर निदान हुंडा तरी घेता येतो असे सांगणा-या गावक-यांचा व्हिडिओ केबीसीत दाखविण्यात आला. या प्रकारावर गावाक-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मदान कालन गावाच्या पंचायतीचे मुख्य त्रिलोक चंद यांनी गावाबद्दल अशी चुकीची माहिती कशी दाखविली जाऊ शकते  असा प्रश्न उपस्थित करत सदर घटनेबाबत योग्य कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगितले.
केबीसीत दाखविण्यात आलेल्या सदर भागादरम्यान अमिताभ बच्चन यांनी भारतातील स्त्री भ्रूणहत्यांच्या घटनांवर प्रकाश टाकला होता. दरम्यान, केबीसीत सहभागी झालेल्या ऋषी राजला दोन मुली असून त्याने जिंकलेल्या रक्कमेचा वापर मुलींच्या शिक्षणासाठी करणार असल्याचे सांगितलेले.