|| हर्षद कशाळकर

रायगड लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीप्रणीत आघाडी असो वा भाजप-शिवसेना युती, दोघांच्याही प्रचारात माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर ए.आर. अंतुले हे केंद्रस्थानी आहेत.

रायगड जिल्ह्याच्या वाटचालीत अंतुले यांची मोठे योगदान आहे. १९८९, १९९१, १९९६ व २००४ मध्ये अंतुले यांनी रायगडचे प्रतिनिधित्व केले. जिल्ह्य़ाच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव राहिला. त्यांच्या पश्चात होणारी ही लोकसभेची पहिलीच निवडणूक आहे. पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी अंतुले आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत अंतुलेंचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेला हा मतदारसंघ काँग्रेसने राष्ट्रवादीसाठी सोडला होता. राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे अंतुले नाराज झाले होते. त्यांनी रायगड आणि मावळ दोन्ही मतदारसंघांतील शेकापच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला होता. या लोकसभा निवडणुकीत बॅरिस्टर अंतुले या नावाचा करिष्मा कायम आहे. निवडणुकीच्या तोंडावर अंतुलेंचे चिरंजीव नाविद यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ज्या अंतुलेंचा हात धरून तटकरेंनी राजकारणात प्रवेश केला, त्यांचाच विश्वासघात तटकरे यांनी केल्याचा शिवसेनाचा आरोप आहे. हाच मुद्दा शिवसेनेच्या अनंत गिते यांनी प्रचारात उचलून धरला आहे. गीते यांनी २००९ मधील निवडणुकीत अंतुलेंवर टीका केली होती, असा मुद्दा शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी उचलून धरला आहे. तटकरे यांनीही अलिबाग येथील काँग्रेस भवन येथे जाऊन बॅरिस्टर अंतुलेंच्या तसबिरीला अभिवादन केले. कोकणातील सागरी मार्गाला बॅरिस्टर अंतुलेंचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली.