माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांनी अपात्र कंपन्यांना बेकायदेशीरपणे टूजी परवाने मंजूर केले आणि त्या बदल्यात द्रमुकचे नेते करुणानिधी यांच्या कुटुंबीयांशी संबंधित ‘कलाईगनार’ दूरचित्रवाणी वाहिनीला २०० कोटी रुपये देण्यात आले, असे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वतीने सोमवारी विशेष न्यायालयात स्पष्ट करण्यात आले.

टूजी घोटाळ्याप्रकरणी सोमवारी अंतिम युक्तिवाद सुरू झाला त्या वेळी विशेष सरकारी वकील आनंद ग्रोव्हर यांनी आरोप केला की, राजा आणि अन्य आरोपींनी कारस्थान रचले आणि २०० कोटी रुपये हा या सौद्याचा मोबदला आहे. विविध कंपन्यांमार्फत कलाईगनार दूरचित्रवाणी वाहिनीला रक्कम हस्तांतरित करण्यात आली. राजा यांना टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने चौकशीसाठी पाचारण केले तेव्हा ही रक्कम परत करण्यात आली, असेही ग्रोव्हर म्हणाले.
कलाईगनार दूरचित्रवाणी वाहिनी द्रमुकच्या खासदार कनिमोळी आणि त्यांची आई दयालू अम्मल यांच्या मालकीची असून राजा हे त्याच पक्षाचे आहेत, असे ग्रोव्हर यांनी विशेष सीबीआय न्यायाधीश ओ. पी. सैनी यांना सांगितले. राजा आणि अन्य काही जणांनी अपात्र कंपन्यांना परवाने मंजूर करण्यासाठी कारस्थान रचले, असा आरोपही ग्रोव्हर यांनी केला. या प्रकरणी पुढील युक्तिवाद २७ जुलै रोजी होणार आहे.