भारतीय लष्कराचे नाव घेतले की आपल्या सगळ्यांच्याच मनात आदराची भावना निर्माण होते. लष्कर, त्यांचे काम, लष्कराचे जवान त्यांच्या मनात असलेली देशभक्तीची भावना. या सगळ्या गोष्टींचा आपल्यालाही गर्व वाटतो. देशाच्या सीमेचे रक्षण करताना जवान अनेकदा पराक्रम गाजवतात यामुळेही आपल्याला त्यांचा अभिमान वाटतो.मात्र भारतीय लष्करातील एक जवान लग्न करण्यासाठी दोनवेळा त्याचा लष्करी तळ सोडून पळाला असल्याची माहिती समोर आली आहे.

पहिल्यांदा हा जवान पळाला तेव्हा त्याला पकडण्यात आले आणि आर्मी कोर्टासमोर हजर करण्यात आले. मात्र तो पुन्हा पळाला. पी. नवीन असे या जवानाचे नाव आहे. तो आंध्रप्रदेशातील कृष्णनगर या ठिकाणी राहतो. भारतीय सैन्यदलात ८ वर्षांपेक्षा जास्त काळ त्याने कर्तव्य बजावले आहे. शौर्य आणि चांगली कामगिरी यासाठी त्याला सन्मानही मिळाला आहे. ‘आजतक’ या वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

पी. नवीन पहिल्यांदा लष्करी तळ सोडून पळाला तेव्हा त्याला शोधण्यासाठी चार महिने लागले होते. त्याच्या पथकाने त्याला पकडले आणि हरयाणा येथे त्याला घेऊन जात होते. त्याच दरम्या बंगळुरु स्टेशन येताच हा जवान पुन्हा एकदा लष्कराच्या जवानांना चकमा देऊन पळून गेला. सैन्य दलाच्या नोकरीला कंटाळलो आहे आणि आता आपल्याला लग्न करायचे आहे असे त्याने त्याच्या सहकाऱ्यांना सांगितले आहे. नवीनच्या घरातली आर्थिक स्थिती बेताची असल्याने तो सैन्यदलात रुजू झाला. ८ वर्षे त्याने चांगले काम केले.

मात्र २०१७ मध्ये तो हरयाणातून पळाला. त्याच्या कुटुंबीयांनाही सैन्यदलाने ही बाब सांगितली. नवीनच्या कुटुंबीयांनीही नवीनने पुन्हा सैन्यात रुजू व्हावे असा आग्रह धरला होता. मात्र या जवानाचे मन परिवर्तन झाले नाही. आता हा जवान पुन्हा एकदा पळाला आहे त्याचा शोध लष्कराकडून घेतला जातो आहे. पी नवीन हा जवान आणि लष्करात सुरु असलेली ही लपाछपी आणखी किती दिवस चालते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.