नोएडा पोलिसांनी मुंबईतील एका व्यक्तीला आर्थिक घोटाळ्याप्रकरणी त्याच्या पत्नी आणि मुलासहित अटक केली आहे. आरोपीच्या भावाने केलेल्या तक्रारीनंतर अटकेची कारवाई करण्यात आली. आरोपीने आर्थिक घोटाळा करताना आपल्या मृत आईची 285 कोटींची संपत्ती मिळवण्यासाठी तिला कागदपत्रांवर जिवंत दाखवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सुनील गुप्ता, पत्नी राधा आणि मुलगा अभिषेक यांना 15 डिसेंबरला पवईमधील हिरानंदानी गार्डन्स येथील घरातून अटक कऱण्यात आली. न्यायालयात हजर केलं असता गुन्हा दाखल कऱण्याचा आदेश देण्यात आला. विजय गुप्ता यांनी आपला मोठा भाऊ सुनील गुप्ता, त्याची पत्नी, दोन मुलं आणि इतर पाच जणांविरोधात आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार केली होती.

‘आईच्या मृत्यूनंतर सुनील गुप्ता याने खोटी कागदपत्रं तयार करत आई जिवंत असल्याचं दाखवत कंपनी आपल्या आणि कुटुंबाच्या नावे करण्याचा प्रयत्न केला’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सुनील आणि विजय गुप्ता यांच्या आई कमलेश राणी यांचं 7 मार्च 2011 रोजी निधन झालं. त्यांची 285 कोटींची संपत्ती होती, ज्यामध्ये मुंबईतील मेणबत्ती तयार करणाऱ्या फॅक्टरीचा समावेश होता. नोएडामध्ये कंपनीचं कार्यालय आहे.

आपल्या मृत्यूपत्रात त्यांनी आपली संपत्ती दोन्ही मुलांमध्ये वाटून देण्यास सांगितलं होतं. विजय गुप्ता यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेत आपल्या भावाने खोट्या कागदपत्रांच्या आधारे आपण पार्टनर असणाऱ्या कंपनीचा ताबा घेतला असल्याचा आरोप केला.

सुनील गुप्ता याने आईच्या मृत्यूनंतर सात दिवसांनी रजिस्ट्रार ऑफिसमध्ये कागदपत्रं सादर करत ही कंपनी आपल्याला आईकडून भेट म्हणून मिळाली असल्याचा दावा केला होता. मात्र तपासात ही कागदपत्रं खोटी असून सुनील गुप्ता याने आई जिवंत असल्याचा बनाव केला असल्याचं समोर आलं.

विजय गुप्ताने केलेल्या आरोपानुसार सुनीलने आईच्या मृत्यूनंतर लगेचच कंपनीच्या खात्यातून 29 कोटी एका कंपनीच्या नावे ट्रान्सफर केले. ही कंपनी त्याच्या मित्राची होती. आपण जेव्हा त्याला जाब विचारला तेव्हा त्याने तिघांकडून आपल्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप केला. पोलिसांनी कारवाई करत अटकेची कारवाई केली आहे.