अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला लवकरच सुरुवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार आहे. यासाठी ५ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत तयारी सुरू झालेली आहे. दरम्यान, मंदिर निर्माणासंदर्भातच एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. मंदिर निर्माण करत असताना मंदिराच्या २ हजार फूट खाली एक ‘टाइम कॅप्सूल’ (वर्तमानकालीन महत्वाच्या घटनांची नोंद असलेले कागदपत्र व इतर वस्तू असलेली जमिनीत पुरुन ठेवलेली कुपी कालकुपी भावी पिढ्याना उत्खननानंतर सद्यःस्थितीची माहिती व्हावी हा त्यामागील हेतू असतो.) देखील ठेवण्यात येणार आहे.

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य रामेश्वर चौपाल यांनी म्हटले आहे की, राम मंदिराच्या बांधकामाला सुरूवात करताना जमिनीपासून २ हजार फूट खाली एक ‘टाइम कॅप्सूल’ ठेवण्यात येणार आहे. भविष्यात एखाद्याला मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असल्यास त्याला यामुळे रामजन्मभूमी बद्दलची केवळ तथ्यं सापडतील.

५ ऑगस्ट रोजी मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम होणार असून, यासाठी विशेष तयारी सुरू आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी संगम अर्थात गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम असलेल्या ठिकाणाची माती अयोध्येत आणण्यात येणार आहे. तसेच, गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची पूर्वी १२८ फूट इतकी होती, ती वाढवण्यात आली आहे. आता कळसाची उंची १६१ फूट इतकी असणार आहे. यात मंदिराच्या भिंती ६ फुटांच्या दगडांनी बांधण्यात येणार आहे. तर दरवाजा संगमरवरी दगडानं बनवण्यात येणार आहे. मंदिराच्या पूर्वीच्या रचनेत तीन कळस होते. मात्र सुधारित प्रस्तावात आता ५ कळस असणार आहेत. तर मंदिराला पाच प्रवेशद्वार असणार आहेत.

अयोध्येतील राम मंदिरासाठी हिंदूच नव्हे तर सर्व समुदायांकडून आलेल्या देणग्या स्वीकारल्या जातील असे रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त संस्थेचे सदस्य विश्वप्रसन्न तीर्थ स्वामी यांनी म्हटले आहे. मंदिराच्या कामकाजावर ही विश्वस्त संस्था देखरेख करीत आहेत.