इजिप्तच्या आलेक्झांड्रिया शहरात दोन प्रवासी रेल्वे गाड्यांची समोरासमोर टक्कर झाल्यानं भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३६ प्रवासी ठार झाले आहेत तर १२३ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. गेल्या दशकभरात घडलेला हा सर्वात भीषण अपघात आहे अशी माहिती इजिप्तच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त होते आहे.

आलेक्झांड्रियाहून एक प्रवासी रेल्वे कैरोच्या दिशेनं निघाली होती मात्र खोर्शिद या भागात जेव्हा ही रेल्वे आली तेव्हा दुसऱ्या रेल्वेसोबत तिची टक्कर झाली आणि मग हा भीषण अपघात घडला. दोन रेल्वे गाड्यांची टक्कर नेमकी कशी झाली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र ही टक्कर झाल्यानं ३६ प्रवासी ठार झाले आणि १२३ प्रवासी जखमी झाले आहेत अशी माहिती इजिप्तच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं असून रूग्णवाहिकांच्या आधारे जखमी रूग्णांना उपचारांसाठी तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात येतं आहे. इजिप्तच्या रेल्वे यंत्रणेवर टीका होते आहे कारण या ठिकाणी असलेली रेल्वे यंत्रणा कुचकामी आहे अशी चर्चा आता होते आहे. इजिप्तमध्ये झालेला हा पहिला रेल्वे अपघात नाही, याआधीही झालेल्या अपघातांमध्ये रेल्वे स्टेशन आणि रेल्वे रूळ याबाबत रेल्वे यंत्रणेकडून पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचं समोर आलं आहे.

मागील वर्षी इजिप्तमध्ये १२४९ रेल्वे अपघात झाले होते, तर २००९ मध्ये रेल्वे अपघातांची संख्या १५७७ इतकी प्रचंड होती. शुक्रवारी झालेल्या अपघातानंतर तरी इजिप्तच्या रेल्वे यंत्रणेकडून सुरक्षेचे नियम पाळले जातील आणि प्रवाशांची काळजी घेतली जाईल का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातो आहे.