उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झालेल्या भीषण अपघातात वडिलांसहित दोन मुलांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हायवेशेजारी घराबाहेर झोपले असताना तांदळाने भरलेला ट्रक पलटला. वडील आणि दोन्ही मुलं ट्रकखाली आल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने ट्रकच्या खाली अडकलेले तिन्ही मृतदेह बाहेर काढले. अपघातानंतर स्थानिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनी तात्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

हमीरपूर सागर राष्ट्रीय महामार्गावरील मछरिया परिसरात रिंकू तिवारी (४२) आपल्या घराबाहेर जे अगदी हायवेला लागून आहे तिथे आपली दोन मुलं लक्ष्मी (५) आणि अभिषेकसोबत (१०) झोपले होते. यावेळी तांदळाने भरलेला ट्रक गल्लामंडी येथे चालला होता. ट्रक नाल्यावर चढताच झाकण तुटलं आणि चाक नाल्यात फसून ट्रक आडवा झाला. ट्रक पलटी होऊन झोपलेल्या कुटुंबाच्या अंगावर जाऊन पडला. या अपघातात वडील आणि दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला.

ट्रकचा अपघात होताच झालेला मोठा आवाज ऐकून लोक घराबाहेर आले आणि मदतीसाठी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने बचावकार्य सुरु केलं. अखेर बऱ्याच वेळानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं.