जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली हा पुरावा इम्रान खान यांच्यासाठी पुरेसा नाही का? असा प्रश्न आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने उपस्थित केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज व्हिडिओ जारी करत भारताने पुलवामा प्रकरणात पाकिस्तानवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत असं म्हटलं आहे. तसंच भारताने पुरावा द्यावा आम्ही कारवाई करू असेही इम्रान खान यांनी म्हटलं आहे. यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने इम्रान खान यांना उत्तर मागितलं आहे. हल्ला झाल्यानंतर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारली. पाकिस्तानला आणखी कोणता पुरावा हवा आहे असंही इम्रान खान यांना विचारलं आहे.

इम्रान खान यांच्या नया पाकिस्तानचे वक्तव्यही परराष्ट्र मंत्रालयाने खोडून काढलं आहे. पठाणकोटमध्ये हल्ला झाला, उरीमध्ये हल्ला झाला तेव्हाही कारवाई करू असं पाकिस्तानने म्हटलं होतं. मात्र त्या फक्त पोकळ गर्जनाच ठरल्या पाकिस्तानकडून काहीही करण्यात आले नाही. हाच का तुमचा नया पाकिस्तान? असं इम्रान खान यांना परराष्ट्र मंत्रालयाने विचारलं आहे.

जैश ए मोहम्मद ही दहशतवादी मसूद अजहरची संघटना आहे हे जगाला माहित आहे. अशात पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात की जैश ए मोहम्मदने केलेल्या दाव्यात तथ्य नाही, मग हा भ्याड हल्ला कोणी केला? मसूद अजहरची ही संघटना आहे. मसूद अजहर पाकिस्तानात रहातो त्यामुळे या हल्ल्याचा संबंध पाकिस्तानशी नाही असे वक्तव्य इम्रान खान करूच कसे शकतात असेही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.