देशात गेल्या काही काळापासून विमान कंपन्यांसंदर्भात अनेक वादग्रस्त बाबी समोर येत आहेत. त्यात आता आणखी एक वादग्रस्त घटना घडली असून एअर इंडियाने एका व्हिलचेअरवरील अपंग व्यक्तीला विमानात प्रवेश नाकारला आहे.


राजकीय पुढाऱ्यांच्या अरेरावीमुळे त्यांच्यावर विमान कंपनीने बंदी घातल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. तसेच कधी क्रू मेंबर्सचा मनमानी कारभार तर कधी पायलटला उशीर आल्यामुळे विमान उड्डाणाला उशीर झाल्याने विमान कंपन्या चर्चेत राहिल्या आहेत. त्यात आता अपंग व्यक्तीला विमानात प्रवेश नाकारल्याने नव्या वादाची भर पडली आहे.

व्हिलचेअरने प्रवास नाकारलेल्या प्रवाशाचे नाव कौशिक मुजूमदार असून १७ डिसेंबर रोजी त्यांनी बेंगळूरू येथून कोलकाताकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे तिकीट काढले होते. नियोजित वेळेत ते विमानतळावरही पोहोचले. मात्र, त्यांना अंतिम क्षणी विमानात बसण्यास परवानगी नाकारण्यात आली. ते व्हिलचेअरचा वापर करीत असल्याने त्यांना हा प्रवास नाकारण्यात आला.

मुजूमदार यांची व्हिलचेअर ही बॅटरीवर चालणारी असल्याने एअर इंडियाने यावर आक्षेप घेतला होता. सुरक्षेच्या कारणास्तव या व्हिलचेअरवरुन त्यांना विमान प्रवास करता येणार नाही, असे एअर इंडियाचे म्हणणे होते. मात्र, त्यानंतर या प्रकरणी एअर इंडियाकडून कुठलेही स्पष्टीकरण आलेले नाही.