रात्री अनेकांना गाणी ऐकत झोपायला आवडतं. रात्रीच्या वेळी इतरांना त्रास होऊ नये यासाठी अनेकजण हेडफोन लावून गाणी ऐकत असतात. अशाच पद्धतीने हेडफोन लावून गाणी ऐकत झोपणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे. फातिमा असं या महिलेचा नाव असून, आपल्या या गाणी ऐकण्याचा छंदापायी त्यांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमधील चेन्नईत ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारची आहे. कंथूर येथे राहत असलेल्या फातिमा यांना त्यांचे पती सकाळी झोपेतून उठवत होते, मात्र त्यांना जाग येत नव्हती. फातिमा उठत नसल्याचं पाहून पतीने आरडाओरडा सुरु केला आणि शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेलं. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. रुग्णालयानेच कंथूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

शॉर्ट सर्किटमुळे लागला करंट
पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची केस दाखल केली आहे. करंट लागल्यानेच महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘महिला शनिवारी रात्री हेडफोन लावून झोपली होती. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे’.