राजस्थानमधील भरतपूरमध्ये एका करोनाबाधित महिलेच्या करोना चाचणीच्या अहवालांमुळे डॉक्टरही चक्रावले आहे. या महिलेच्या करोना चाचणीच्या निकाल करोनासंदर्भात सर्वच अंदाज चुकीचे असल्याचे दर्शवत आहेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल मात्र मागील पाच महिन्यात या महिलेचे करोना चाचणीचे ३१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सामान्यपणे करोना विषाणूचा संसर्ग झाल्यापासून उपचारानंतर त्याचा प्रभाव कमी होण्यापर्यंतचा काळ हा १४ दिवसांचा असतो मात्र या महिलेच्या बाबतीत तसं होताना दिसत आहे.

या महिलेचे १७ आरटी-सीपीआर आणि १४ अ‍ॅण्टी एजंट करोना चाचण्या करण्यात आल्या. या सर्व चाचण्यांचा निकाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला भरतपूरमधील एका आश्रमात राहते. या महिलेची पहिली चाचणी चार सप्टेंबर रोजी करण्यात आली होती तर नुकतीच सात जानेवारी रोजी तिची चाचणी करण्यात आली. जेव्हा जेव्हा या महिलेच्या करोना चाचणीचे निकाल येतात तेव्हा तेव्हा डॉक्टर आणखीन संभ्रमात पडतात.

शारदा देवी असं या महिलेचं नाव असून ते भारतपूरच्या अपना आश्रममध्ये ऑगस्ट महिन्यापासून राहत आहेत. आश्रमाममध्ये त्यांना दाखल करुन घेतानाच नवीन नियमांप्रमाणे त्यांची करोना चाचणी करण्यात आली असता ती चाचणी पॉझिटिव्ह आली.  “तेव्हापासून त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याच्यावर अ‍ॅलोपेथिक, होमियोपॅथिक आणि आयुर्वेदिक अशा तिन्ही पद्धतीचे उपचार सुरु आहेत. मात्र त्यानंतरही अनेकदा त्यांच्या करोना चाचणीचे निकाल पॉझिटिव्हच आलेत,” असं आश्रमाचे डॉक्टर बी. एम, भरद्वाज सांगतात. विशेष म्हणजे करोना चाचण्या पॉझिटिव्ह येत असल्या तरी शारदा देवी यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांचे वजनही मागील पाच महिन्यांमध्ये सात ते आठ किलोंनी वाढल्याचे डॉक्टर सांगतात. जेव्हा शारदा देवी आश्रमात आल्या होत्या तेव्हा त्या खूपच अशक्त होत्या. त्यांना साधं त्यांच्या पायावर उभंही राहता येत नव्हतं, असंही डॉक्टरांनी सांगितलं.

“सध्या त्या ठणठणीत असल्यातरी त्यांच्या करोना चाचण्यांचे निकाल सातत्याने सकारात्मक येत असल्याने आमची चिंता वाढली आहे. आम्ही भारतपूरमधील आरोग्य अधिकाऱ्यांना आणि जयपूरमधील सवाई मानसिंग रुग्णालयातील अधिकाऱ्यांना शारदा देवी यांच्या रिपोर्ट्ससंदर्भात कळवलं आहे,” असंही भरद्वाज यांनी स्पष्ट केल्याचं आयएएनएसने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

जेव्हा शारदा यांना आश्रमाममध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा त्यांची मानसिक आणि प्रकृती नाजूक असल्याचं सांगण्यात आलं. तेव्हापासून सर्व आरोग्यासंदर्भातील काळजी घेत त्यांना आश्रमातच ठेवण्यात आलं आहे. त्यांना आल्यापासून आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. आम्हाला आश्रमातील इतरांची काळजी घ्यायची असल्याने नव्याने आल्यानंतर शारदा देवींनी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेलं तेव्हापासून त्या आयसोलेशनमध्येच असल्याचं आश्रमाचे अधिकारी सांगतात. ज्या डॉक्टरांनी त्यांची पहाणी केलीय त्यांच्या अंदाजानुसार रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने सातत्याने शारदा देवींचे करोना अहवाल पॉझिटिव्ह येत असावेत.