हत्या केल्याच्या संशयावरुन महिलेला मारहाण करत, कपडे फाडून नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. जमावाला महिलेचा १९ वर्षीय तरुणाच्या हत्येत सहभाग असल्याचा संशय होता. बिहिया पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली आहे. विमलेश साह नावाचा तरुण बेपत्ता होता. दुसऱ्या दिवशी रेल्वे ट्रॅकवर त्याचा मृतदेह आढळला अशी माहिती भोजपूरचे एसपी अवकाश कुमार यांनी दिली आहे.

विमलेश याच्या मृत्यूची माहिती मिळताच दामोदरपूरचे ग्रामस्थ पोलीस ठाण्यात जमा झाले. या हत्येमागे देहविक्री करणाऱ्या महिलेचा सहभाग असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली. संतप्त जमावाने तोडफोड करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक दुकानांना आग लावत तेथील रहिवाशांना मारहाणदेखील केली. देहविक्री करणाऱ्या एका महिलेला जमावाने फरफटत आणलं आणि तिचे कपडे फाडून नग्न धिंड टाकली. यावेळी तिला सतत मारहाण करण्यात येत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

संतप्त जमावाने तेथून जाणाऱ्या एका ट्रेनवर दगडफेकदेखील केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हवेत गोळीबार केला. यावेळी गावकऱ्यांपैकी काहीजणांनी देखील गोळीबार केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सध्या कोणालाही अटक करण्यात आली नसून, परिसरात पोलिसांचा फौजफाटा लावण्यात आला आहे.