X

नरेंद्र मोदींची भेट न झाल्याने नाराज महिलेने जाळली बस

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट न झाल्याने नाराज महिलेने प्रवासी बस पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट न झाल्याने नाराज महिलेने प्रवासी बस पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लखनऊत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुदैवाने आगीने रौद्र रुप धारण करण्याआधीच बसमधील प्रवासी सुखरुप बाहेर पडले. ही बस उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाची होती.

महिलेची ओळख पटली असून वंदना रघुवंशी असं तिचं नाव आहे. महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. महिला स्वतंत्र पूर्वांचल राज्याची मागणी करत होती. यासाठीच तिला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यायची होती. कॅन्टोनमेंट बस स्थानकावर हा प्रकार घडला.

घटनास्थळी उपस्थित एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, वंदना रघुवंशी यांनी बसवर पेट्रोल शिंपडलं आणि आग लावली. आगीत व्होल्वो बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना एका तासाहून जास्त वेळ लागला.

वंदना रघुवंशी आपल्या मागणीसाठी १५ ऑगस्टपासून उपोषणावर होत्या. प्रकृती बिघडू लागल्यानंतर जबरदस्तीने त्यांना २९ ऑगस्ट रोजी जेवण देण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी वंदन रघुवंशी यांना अटक केली आहे.