पतीच्या संपत्तीत वाटा मिळावा यासाठी सईदा बेगम (५०) गेल्या ४१ दिवसांपासून कालाहंडी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. सईदा यांच्या सासरच्यांनी गेल्या पाच वर्षांपासून त्यांना हा हक्क देण्यास नकार दिला आहे. शनिवारी अखेर ओडिशा राज्य कायदा सेवा प्राधिकरणाने त्यांच्या तक्रारीवर सुनावणी करण्यास तयारी दर्शवली. १९९६ रोजी राज्य सरकारने गरिबांना कायदेशीर मदत मिळावी यासाठी राज्य कायदा सेवा प्राधिकरणाची स्थापना केली होती.

सईदा बेगम यांचा जन्म एका दलित कुटुंबात झाला होता. त्यावेळी त्यांचं नाव कुमूदिनी नायक होतं. अब्दुल हबिब यांच्यासोबत लग्न करुन आपण धर्मांतर केलं होतं अशी माहिती त्यांनी दिली. मात्र त्यानंतरही सासरच्यांनी आपल्याला स्विकारलं नाही. मुलीने इच्छेविरुद्ध लग्न केल्याने आई-वडिलांनीही त्यांना स्विकारण्यास नकार दिला. पण ही त्यांच्यासमोर उभ्या राहिलेच्या अडचणींची फक्त सुरुवात होती. १९९९ मध्ये हबिब यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला. यानंतर सासरच्यांनी सईदा यांना मारहाण करत घराबाहेर काढलं. यानंतर सईदा यांनी गोलगप्पा आणि लाकडं विकून आपला उदरनिर्वाह केला. पाच वर्षांपुर्वी त्यांनी आपल्या पतीच्या संपत्तीत वाटा मिळावा अशी मागणी सासरच्यांकडे केली. पण यावेळीही त्यांना धमकावण्यात आलं.

‘मी माझ्या पतीच्या भावांकडे संपत्तीतला वाटा मिळावा यासाठी मागणी केली. माझ्या दोन मुलींच्या लग्नासाठी आणि मुलाला दुकान सुरु करुन देण्यासाठी पैशांची गरज होती. पण त्यांनी मला धमकावलं’, असा आरोप सईदा यांनी केला आहे. आपल्याला अजूनही बाहेरचे समजले जातं असा आरोप सईदाच्या मुलींनी केला आहे.

सईदाची मुलगी रुकसाना सध्या कॉलेजात शिकत आहे. तिने सांगितल्यानुसार, ‘माझ्या चुलत भावांनी गळा कापण्याची धमकी दिली आहे त्यामुळे नेहमी मी आईसोबत असते’. सईदा यांची दुसरी मुलगी रुबी २३ वर्षांची असून, मुलगा सलमान १९ वर्षांचा आहे. मसजिद कमिटीने मात्र हे कौटुंबिक भांडण असून, त्यात आपण पडू शकत नसल्याचं म्हटलं आहे.