नोकरी मिळत नसल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नोकरी मिळत नसल्याने तरुण गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. दिल्लीतील मयूर विहार फ्लायओव्हरवरुन उडी मारुन त्याने आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सौरभ असं या तरुणाचं नाव असून बिहारमधील भोजपुरी गावचा तो रहिवासी होता. दिल्लीतील अशोख नगरमध्ये तो वास्तव्यास होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभने बिहार महाविद्यालयातून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. मयूर विहार पोलिसांना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. सौरभ याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी सौरभच्या घरातून एक डायरी सापडली आहे. या डायरीत त्याने आपल्याला नोकरी मिळत नसल्याने प्रचंड तणाव आला असल्याचं लिहिलं होतं. डायरीतील इतर मजकूर तपासला असता बेरोजगार असल्याने सौरभ तणावात असल्याचं स्पष्ट होत आहे. सौरभ अडीच महिन्यांपूर्वीच दिल्लीत शिफ्ट झाला होता आणि नोकरीच्या शोधात होता. पोलिसांनी त्याचा मृतदेह कुटुंबाकडे सोपवला आहे.