वडिलांच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून मुलाने आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना तामिळनाडूत घडली आहे. आत्महत्येपुर्वी मुलाने सुसाईट नोट लिहिली असून आपल्या वडिलांच्या दारुच्या व्यसनामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचं लिहिलं आहे. दिनेश असं या मुलाचं नाव असून रेल्वे ब्रिजवर गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. रेल्वे ब्रिजवरुन जाणाऱ्यांनी मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना कळवलं. दिनेस नीटच्या परीक्षेसाठी तयारी करत होता. ६ मे रोजी त्याची परीक्षी होती.

‘आप्पा मी दिनेश हे पत्र लिहितोय. माझ्या मृत्यूनंतर तुम्ही दारु पिऊ नका. तुम्ही दारु पित असल्याने माझ्या चितेला अग्नी देऊ नका. तुम्ही तुमचे केसही कापत नाही. नेमकं सांगायचं झालं तर तुम्ही माझ्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करु नका. ही माझी अखेरची इच्छा आहे. त्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही’, असं दिनेश याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. पुढे त्याने लिहिलं आहे की, ‘आप्पा तुम्ही दारु पिणं बंद करा. ही माझी अखेरची इच्छा आहे. त्यानंतरच मला शांती मिळेल’.

दिनेश याने तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी यांच्यासाठीही एक संदेश लिहिला आहे. ‘आतातरी तामिळनाडूचे मुख्यमंत्री दारुची दुकानं बंद करतात का हे पहावं लागेल. जर त्यांनी केली नाहीत, तर माझा आत्मा भटकत राहिल’, असं पत्रात लिहिण्यात आलं आहे.

दिनेशच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेशचे वडील रोजंदारी कामगार असून त्यांना दारुचं प्रचंड व्यसन आहे. तरुण वयात त्याच्या आईचं निधन झालं. त्याच्या वडिलांना डॉक्टरांनीही कित्येकदा दारु सोडण्याचा सल्ला दिला होता.

‘दिनेश खूप हुशार विद्यार्थी होता. त्याने दहावीत ५०० पैकी ४६४ मार्क मिळवले होते. त्याला डॉक्टर होण्याची इच्छा होता. त्याने नीट परीक्षेसाठी अर्जही केला होता, ज्याची सहा तारखेला परीक्षा होती’, अशी माहिती दिनेशच्या काकांनी दिली आहे. ‘घरातून निघताना त्याने आपण आजीच्या घरी जात आहोत असं सांगितलं होतं. तो आत्महत्या करेल याची थोडीशीही कल्पना नव्हती’, असंही त्यानं सांगितलं आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.