सध्या सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात व्यस्त आहेत. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र यादरम्यान लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झाल्याने एकच खळबळ माजली. कारण हे वेळापत्रक निवडणूक आयोगाने नाही तर एका तरुणाने वेबसाइटवर अपलोड केलं होतं. या वेळापत्रकात निवडणूक किती टप्प्यात होणार आहे याची संपूर्ण माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी कारवाई करत हे वेळापत्रक वेबसाइटवरुन हटवलं. सायबर सेलने संबंधित तरुणाला अटक केली आहे.

झारखंडमधील एका तरुणाने लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक आपल्या वेबसाइटवर अपलोड केलं होतं. यामध्ये लोकसभा निवडणूक कोणत्या तारखेला होणार असून किती टप्प्यात पार पडेल याची माहिती देण्यात आली होती. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलला माहिती मिळताच हे खोटं वेळापत्रक हटवण्यात आलं आणि अटकेची कारवाई करण्यात आली. नंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली.

गोमंत कुमार असं या तरुणाचं नाव आहे. गोमंत कुमारने आपली वेबसाइट ‘mytechbuzz’ वर आगामी लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक शेअर केलं होतं. गोमंतने व्हॉट्सअॅपवर आपल्याला हे वेळापत्रक मिळाल्याचा दावा केला.

निवडणुकीची तारीख जाहीर करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. जर लोकसभा निवडणूक असेल तर भारतीय निवडणूक आयोग तारखा जाहीर करतं आणि राज्यातील किंवा जिल्हा स्तरावरील निवडणूक असेल तर राज्य निवडणूक आयोग वेळापत्रक जाहीर करतं. रितसर पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं जातं.