मध्य प्रदेशातील दतिया येथील एका धक्कादायक घटना समोर आली आह. एका तरुणाचा गळफास लागल्याने मृत्यू झाला आहे. तरुण व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून गळ्याभोवती ओढणी आळवून आत्महत्या कशी करायची हे गर्लफ्रेंडला दाखवत होता. यावेळी तोल गेला आणि गळफास लागून तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाचं नाव हितेश कुशवाहा असून तो २१ वर्षांचा होता.

हितेश आपल्या रुममधील प्लास्टिकच्या टाकीवर चढला होता. याचवेळी ओढणीचा गळफास तयार करत आत्महत्या कशी करायची हे आपल्या गर्लफ्रेंडला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दाखवत होता. याचवेळी तोल गेला आणि पायाखाली असणारी प्लास्टिकची टाकी निसटली. गळफास लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

सोमवारी सकाळपर्यंत रुममधून कोणीही बाहेर न आल्याने कुटुंबीयांना दरवाजा ठोठावला. पण आतून कोणीही आवाज दिला नाही. बराच वेळ आवाज देऊनही काही प्रतिक्रिया मिळवत नसल्याने बहिणीने फटीतून पाहण्याचा प्रयत्न केला. यावेळी हितेशचा मृत्यू झाल्याचं समजलं.

यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी मोबाइल जप्त केला आहे. रविवारी रात्री हितेश आपल्या मोबाइलवर मित्रांसोबत गेम खेळत होता. त्याच्या मोबाइलमध्ये गळफास घेण्यासंबंधीचे दोन व्हिडीओही सापडले आहेत.