दहशतवादाचा मार्ग स्विकारलेल्या आपल्या मुलाला पुन्हा घरी येण्यासाठी त्याच्या सावत्र आईने भावनिक साद घातली आहे. हिंसेचा मार्ग सोडून घरी ये अशी साद या २५ वर्षीय तरुणाच्या सावत्र आईने घातली आहे. हरुन अब्बास वानी असं या तरुणाचं नाव असून त्याने एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. नुकतंच हिजबूल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत तो भरती झाला आहे. एका खासगी कंपनीत तो काम करत होता. १ सप्टेंबर रोजी त्याने दहशतवादाचा मार्ग स्विकारत हिजबूल मुजाहिद्दीनमध्ये भरती झाला.

हरुन अब्बास वानी याचा हातात बंदूक घेऊन उभा असलेला फोटो ४ सप्टेंबरला सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो पाहिल्यानंतर त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. एएनआयशी बोलताना हरुन अब्बास वानीची सावत्र आई नुसरत बेगम यांनी म्हटलं की, ‘त्याने अशा प्रकारचं पाऊल उचलल्याने आम्हाला खूप मोठा धक्का बसला आहे. त्याने पुन्हा घरी यावं अशी आमची इच्छा आहे. हिंसेचा मार्ग अवलंबणे हा जिहाद नसून त्याचा खरा अर्थ आपल्या वयस्कर आई वडिलांची काळजी घेणे आहे. हिंसेतून काहाही हाती लागत नाही’.

हरुन अब्बास वानी याच्या आजीनेही त्याला दहशतवादाचा मार्ग सोडून लवकरात लवकर घरी येण्याचं आवाहन केलं आहे. ‘तू आमचा स्वप्नभंग केला आहेस. तू भावाच्या लग्नासाठी पुन्हा घरी येण्याचं आश्वासन दिलं होतंस. पण तू तुझं आश्वासन पाळलं नाहीस आणि आम्हाला दु:ख दिलंस. तुझ्या आजारी आईचं काय होईल याचा एकदाही विचार केला नाही. आता तिच्यासाठी औषधं कोण आणणार’, असं त्याच्या आजीने म्हटलं आहे. पुढे त्या म्हणाल्या आहेत की, ‘हातात बंदूक घेताना तुझ्या जबाबदाऱ्या विसरलास. अशा पद्धतीने कोणत्याही समस्या सुटणार नाही आहेत. जिहाद म्हणजे आपल्या वयस्कर आई वडिलांची काळजी घेणे, हिंसेचा मार्ग स्विकारणं नाही’.

जुलै महिन्यापासून काश्मीर खोऱ्यात एखादा तरुण दहशतवादी संघटनेत भरती होण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी अबिद हुसैन भट हा तरुण लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत इतर दहशतवाद्यांसोबत तो ठार झाला होता.