१ ऑगस्टपासून नवी सुविधा

युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे यूआयडीएआय या संस्थेने चेहऱ्यावरून ओळख तयार करण्याची प्रक्रिया १ ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकली आहे.

यूआयडीएआय या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी सांगितले, की नवीन चेहरा आधारित ओळख प्रक्रिया सुरू करण्यास आधी १ जुलैची मुदत दिली होती, ती आता १ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. डोळ्याची बाहुली, हाताचे ठसे व चेहरा ओळख या तीन मार्गानी प्रत्येक व्यक्तीची ओळख घेतली जात आहे.

व्यक्तीची बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पटवताना अडचणी येत असल्याने चेहरा ओळख पद्धत सुरू करण्याचे ठरवले होते. त्यावर काम सुरू आहे. पण जुलैऐवजी ऑगस्टपासून ही पद्धत सुरू केली जाईल. हे तंत्रज्ञानावर आधारित काम आहे, त्यामुळे ती कुठली गोष्ट सहज विकत घेतो तसे नाही, हे तंत्रज्ञान विकसित करावे लागते, त्यामुळे त्याला १ ऑगस्टपर्यंत वेळ लागेल.

आधार कार्डधारकाचा ओटीपी, बोटाचे ठसे, डोळ्याची बाहुली यांच्या जोडीला चेहरा ओळख हा एक पूरक मार्ग म्हणून वापरला जाणार आहे. बायोमेट्रिक ओळख पटवताना काही वेळा बोटावरील रेषा घासल्या गेल्याने ओळख पटत नाही त्या प्रसंगी चेहरा ओळख उपयोगात आणली जाईल.

१ ऑगस्टपासून चेहरा ओळख तंत्रज्ञान एजन्सीजना उपलब्ध केले जाईल नंतर त्यात काही अडचणी येत असतील तर त्याचाही आढावा  घेतला जाईल, त्यानंतर काही महिन्यात ती पद्धत स्थिर होईल. आतापर्यंत १२१.१७ कोटी लोकांनी आधार नोंदणी केली असून १९.६ अब्ज लोकांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा वापर झाला आहे.