आधार कार्डांचा महत्त्वाचा डेटा आणि गोपनीय माहिती फुटली आहे अशा काही बातम्या मध्यंतरीच्या काळात आल्या होत्या. मात्र या सगळ्या बातम्या निराधार आहेत. सगळ्यांची आधार कार्ड सुरक्षित आहेत असा दावा युआयडीएआयने केला आहे. आधारशी संबंधित सगळी गोपनीय माहिती आणि डेटा यांची चोरी झालेली नाही असे युआयडीएआयने स्पष्ट केले.

ZDNet या ऑनलाइन पोर्टलने आधार कार्डशी संबंधित महत्त्वाची गोपनीय माहिती चोरीला गेल्याचे म्हटले होते. अनेक आधार कार्डांची माहिती यामुळे सार्वजनिक झाली आहे असाही दावा या पोर्टलने केला होता. मात्र हा दावा खोडून काढत सगळी माहिती सुरक्षित आहे कोणत्याही प्रकारची चोरी झालेली नाही असे युआयडीएआयने म्हटले आहे. ज्या पोर्टलने या संदर्भातली बातमी दिली ती निराधार आणि बेजबाबदारपणे दिलेली बातमी होती असेही युआयडीएआयने म्हटले आहे.

या पोर्टलचा हवाला देऊन ज्या बातम्या देण्यात आल्या आहेत त्यांनाही काहीही आधार नाही असेही युआयडीएआयने स्पष्ट केले. सरकारी कंपनीत तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने हा डेटा चोरीला गेल्याचे वृत्त या पोर्टलने दिले होते. तसेच आम्हीच या संबंधीचा शोध घेतला असेही या पोर्टलने म्हटले होते पण त्यांनी दिलेली ही सगळी बातमीच बिनबुडाची आहे. जर सरकारी कंपनीत तंत्रज्ञानाचा अभाव आहे तर लाखो आधार कार्डांचा डेटा चोरीला गेला असता. मात्र तसे घडलेले नाही असेही युआयडीएआयने म्हटले आहे.

कोणत्याही व्यक्तीकडे तुमचा आधार कार्ड क्रमांक असेल तर त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत नाही. या क्रमांकामुळे कोणत्याही आर्थिक गैरव्यवहाराचा किंवा फसवणुकीचा मार्ग खुला होता नाही. आधार कार्ड तयार करतााच हाताच्या अंगठ्याचा ठसा, डोळ्यांच्या रेटिना सेव्ह केलेला असतो. तसेच वन टाइम पासवर्ड शिवाय आधार कार्डचा क्रमांक वापरून कोणताही व्यवहार करता येत नाही. त्यामुळे निराधार बातम्या देण्याऐवजी जबाबदारीने बातम्या दिल्या गेल्या पाहिजेत असेही युआयडीएआयने या पोर्टलला सुनावले आहे.