स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा होण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही. थेट हस्तांतर मोहिमेत (डीबीटीएल) बँक खाते क्रमांक दिलेला असल्यास अनुदानाची रक्कम जमा होण्यात अडचण येणार नाही, असे पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांनी लोकसभेत सांगितले.
थेट अनुदान हस्तांतर योजनेत स्वयंपाकाच्या गॅसग्राहकांना अनुदानित व विनाअनुदानित सिलिंडर मिळतात. त्यात अनुदानित सिलिंडरचे अनुदान ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होईल त्यासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही असे ते म्हणाले.
प्रधान यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले, की एकाच वेळी पहिल्या सिलिंडरचे अग्रीम अनुदान मिळवण्याची सोयही यात दिली आहे जेणेकरून जे गरीब लोक आहेत ते बाजारपेठ दराने पहिले सिलिंडर खरेदी करू शकतील.
अनुदानाची रक्कम पहिल्या सिलिंडरपासून बाराव्या सिलिंडपर्यंतची असेल. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना त्यांना त्या माध्यमातून अनुदान मिळेल. त्यात आधार कार्ड क्रमांक हा एलपीजी ग्राहक क्रमांक व बँक खाते क्रमांक यांना जोडलेले असतील. जर आधार कार्ड नसेल तर थेट बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाईल. नवीन नियमानुसार आधार कार्ड नसल्याने ग्राहकांना अनुदान रकमेपासून वंचित ठेवता येणार नाही. ज्यांनी या योजनेतील अर्ज भरलेले नाहीत त्यांना तीन महिने मुदतवाढ दिली असून तोपर्यंत त्यांना अनुदानित सिलिंडर मिळतील, अशी माहिती प्रधान यांनी दिली.