बोगस तिकिट बुकिंग रोखण्यासाठी रेल्वेने नवी शल्लक शोधली आहे. ऑनलाईन तिकिटे बुक करताना आधार क्रमांक देणे रेल्वेकडून अनिवार्य करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना १ एप्रिलपासूनच सवलत मिळवण्यासाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात येणार आहे.

२०१७-१८ साठी तयार केलेली योजना सादर करताना रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आधार-आधारित तिकिटींग यंत्रणा आणणार असल्याचे सांगितले होते. यासोबतच रेल्वेचे व्यवहार कॅशलेस करण्यासाठी देशभरात ६ हजार पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मशीन आणि १ हजार ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन लावल्या जाणार आहेत. यासोबतच मे महिन्यापर्यंत तिकिटासाठी एक अॅपदेखील सुरू करण्यात येणार आहे. ‘आयआरसीटीसीवर एकदा नोंदणी करताना आधार क्रमांक आवश्यक असणार आहे. बोगस नोंदणी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे. बोगसपणे करण्यात येणारे तिकिट बुकिंग टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,’ अशी माहिती रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

दलालांपासून सुटका करुन घेण्यासाठी एका नव्या सॉफ्टवेअरवर काम सुरू असल्याची माहितीदेखील रेल्वेकडून देण्यात आली आहे. विविध प्रकारची काळजी घेऊनदेखील दलाल तिकिटे बुक करण्यात यशस्वी होतात. त्यामुळे यावर कायमस्वरुपी उतारा शोधण्याचा प्रयत्न रेल्वेकडून सुरू आहे. पर्यटनाच्या माध्यमातून अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी डोंगराळ भागांमध्ये पर्यटकांसाठी विशेष ट्रेन सुरू करण्याची योजनादेखील रेल्वेने तयार केली आहे. यासोबतच खानपान आणि अन्य सेवांचा दर्जा सुधारुन प्रवाशांचा प्रवास अधिक सुखदायक करण्याचा प्रयत्न रेल्वेकडून करण्यात येणार आहे.

रेल्वेने काही दिवसांपूर्वीच नव्या खानपान सेवा धोरणाची घोषणा केली आहे. या माध्यमातून जेवण तयार करणे आणि त्याचे वितरण करणे वेगळे करण्यात येणार आहे. नवीन खानपान सेवा धोरणानुसार अत्याधुनिक स्वयंपाकघरात खाद्यपदार्थ तयार केले जाणार आहेत. यासोबतच खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यासाठी विविध कंपन्यांना देण्यात येणारी कंत्राटे रद्द करण्यात आली आहेत. यापुढे आयआरसीटीसीकडूनच रेल्वे प्रवाशांना खाद्यपदार्थ तयार करुन पुरवले जाणार आहेत.