आधार आणि पॅन क्रमांक लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत नवी तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार, आता आधार-पॅन लिंक करण्यासाठी ३१ मार्च ऐवजी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आधार आणि पॅन क्रमांक जोडण्यासाठी यापूर्वी देखील वारंवार अंतिम तारखा वाढवण्यात आल्या आहेत. मात्र, यंदा ही तारीख वाढवण्यामागे करोनाचे संकट हे महत्वपूर्ण कारण आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवा-सुविधांशिवाय इतर कोणत्या सेवा-सुविधा सध्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप आधार-पॅन लिंक केलेले नव्हते त्यांच्यासाठी अडचण निर्माण झाली होती.

दरम्यान, सीतारामण यांनी बुधवारी विविध क्षेत्रांसाठी दिलासा देणारे महत्वाचे निर्णय जाहीर केले. यामध्ये कॉर्पोरेट्स, बँका, जीएसटी यांच्यासाठीच्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार, सीएसआर निधीचाही आता करोनाशी संबंधीत कामांसाठी वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.