‘आकाश’ या किफायतशीर किमतीचा टॅब्लेट आता नव्या सुविधांसह उपलब्ध होणार आहे, त्यात सिम स्लॉट व अधिक आकर्षक उपयोजने (अ‍ॅप्लिकेशन) दिली जाणार आहेत. हे सर्व आताच्याच किमतीत दिले जाणार असल्याने ग्राहकांना कुठलीही आर्थिक तोशीस लागणार नाही.
पुढील टप्प्यात आकाश-३ प्रकारातील ५० लाख टॅब्लेट बाजारात येत असून त्यासाठी येत्या फेब्रुवारी महिन्यात जागतिक निविदा काढण्यात येणार आहे.
आकाश-३ टॅब्लेट तयार करणाऱ्या प्रकल्पाच्या समितीतील सदस्यांनी सांगितले की, आकाश टॅब्लेट हे भारतीय उत्पादन अधिक स्वदेशीच रहावे तसेच अनेक दुकानदारांकडे ते उपलब्ध व्हावे असे आमचे प्रयत्न आहेत.
शिक्षण पद्धतीतच टॅब्लेटचा समावेश करण्याचा आमचा इरादा आहे व त्यासाठी पोषक स्थिती निर्माण केली जाईल, असे या समितीचे सदस्य व आयआयटी, मुंबई या संस्थेचे प्राध्यापक दीपक बी. फाटक यांनी सांगितले.
त्यांच्या मते जगातील संगणक कंपन्या आकाश टॅब्लेटची निर्मिती पाहून थक्क झाल्या आहेत व अनेक वितरकांनी त्यात स्वारस्य दाखवले आहे. आकाश ३ हा अधिक वेगवान संस्कारकासह येणार असून तो लिनक्स व अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टीमवरही चालू शकेल. त्यात सिमकार्डही टाकता येईल, त्यामुळे त्याचा वापर मोबाईलसारखाही करता येईल.
आयआयटी मद्रासचे प्रा. अशोक झुनझुनवाला व त्यांचे विद्यार्थीही नवीन आकाश ३ च्या निर्मितीत सहभागी होत आहेत. हृदयाचे ठोके मोजणारे अ‍ॅप्लीकेशन यात समाविष्ट करण्याचा विद्यार्थ्यांचा इरादा आहे. हे टॅब्लेट स्थानिक पातळीवर दुरूस्त होतील अशी सुविधाही दिली जाणार आहे. या टॅब्लेटमधील अनेक सुटे भाग चिनी बनावटीचे असल्याचा आरोप फाटक यांनी फेटाळून लावला.
आकाश-३ चे दोन मॉडेल असणार असून एक शालेय विद्यार्थ्यांसाठी तर दुसरे कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. आकाश-२ हे मॉडेल मुंबई आयआयटीने सीडॅकच्या मदतीने तयार केले होते व त्याचे उदघाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नोव्हेंबरमध्ये केले होते.    

आकाश-३ वैशिष्टय़े
*जागतिक निवदा फेब्रुवारीत काढणार
* पन्नास लाख टॅबलेटची निर्मिती
विविध उपयोजनांचा समावेश
* लिनक्स व अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणार
* चिनी बनावटीचे सुटे भाग वापरल्याचा इन्कार
* मद्रास आयआयटी व मुंबई आयआयटी एकत्र काम करणार