उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये आज आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्या अंगावर अज्ञात व्यक्तीने शाई फेकली. येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी संजय सिंह तिथे गेले होते, त्यावेळी ही घटना घडली. या घटनेवर आम आदमी पार्टीकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. शिवाय, आम आदमी पार्टी प्रमुख मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील या घटनेबद्दल उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

“पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यास पोहचलेल्या आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्यावर शाई फेकवून, भाजपाने आपली काळी बाजू उघड केली आहे. संजय सिहं यांच्यावर जी शाई फेकली गेली, त्याच शाईने योगींच्या काळ्या कारनाम्यांचा काळा इतिहास लिहिला जाईल.”  तसेच, “आज जी शाई भाजपाने खासदार संजय सिंह यांच्यावर फेकवली आहे, त्याच शाईने योगी आदित्यनाथ यांच्या गुंडाराजचा अंत लिहिल्या जाईल.”  असं आम आदमी पार्टी उत्तर प्रदेशच्यावतीने सांगण्यात आलं आहे.

आणखी वाचा- हाथरसमध्ये पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आप खासदार संजय सिंह यांच्या अंगावर फेकली शाई

“संजयजी तुम्ही उत्तर प्रदेश सरकारच्या अन्याय व अत्याचाराविरोधात निर्भिडपणे बोलत आला आहात. त्यांनी तुमच्यावर १४ गुन्हे नोंदवले, कार्यालय सील केले परंतु, तुम्हाला अटक करण्याची हिम्मत नाही करू शकले. तर आज हल्ला घडवला. उत्तर प्रदेश सरकारमधील लोकांचा पराभव आणि नामुष्की यावरून दिसते. याचाच अर्थ तुम्ही योग्य मार्गावर आहात.” अशा शब्दांमध्ये आम आदमी पार्टीचे प्रमुख मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा- संवादातून समस्या सोडवण्याचं मुख्यमंत्री म्हणाले, मग…; प्रियंका गांधींचा योगींना सवाल

आणखी वाचा- हाथरसच्या निमित्ताने उत्तर प्रदेशात जातीय दंगली भडकवण्याचा कट, सुरक्षा यंत्रणांचा दावा

हाथरसला गेलेले संजय सिंह, पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन घरातून बाहेर पडल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अंगावर शाई फेकली. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. संजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीच्या नेत्याच्या शिष्टमंडळाने पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांना धीर दिला.