दिल्लीतील विधानसभा निवडणुकीनंतर मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज जाहीर करण्यात आले असून त्यात आम आदमी पक्षाला बहुमत मिळण्याची चिन्हे आहेत. ७० सदस्यांच्या विधानसभेत आम आदमी पक्षाला काही चाचण्यांत ५३ जागाही देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष निकाल मंगळवारी जाहीर होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराची पावती म्हणून दिल्लीतील निकालांकडे बघितले जात आहे. परंतु मतदानोत्तर चाचण्यांत तरी भाजप नेतृत्वाला मतदारांनी नाकारले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या dv09नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असा अंदाज आहे.  काँग्रेसला ५ किंवा त्यापेक्षा जास्त जागा दाखवलेल्या नाहीत. सर्व मतदानोत्तर चाचण्या साधारण दुपारी तीन वाजता घेण्यात आल्या, तर मतदान ६ वाजता संपले. २०१३ च्या निवडणुकीत आपला २८ जागा मिळाल्या होत्या व त्यांनी ८ जागा मिळालेल्या काँग्रेसचा पाठिंबा घेऊन ४९ दिवसांचे सरकार चालवले होते. त्या वेळी भाजपला ३२ जागा मिळाल्या होत्या.
‘केडर’बेस पक्ष ओळख असलेला भारतीय जनता पक्ष व नवख्या आम आदमी पक्षातील लढाईमुळे देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६७.१४ टक्के मतदान झाले. गतवर्षीच्या तुलनेत पाच वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीवरून यंदा मतदानात दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा मतदानाच्या टक्केवारीने ऐतिहासिक आकडा गाठल्याने भाजपचे धाबे दणाणले आहेत. दिल्लीत कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही हे विशेष.